सकाळ

1.4M Followers

राज्यात 8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच; गृहमंत्री अनिल देशमुख

28 Jun 2020.5:08 PM

सांगली ः राज्यात रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी आश्‍वासक भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

श्री. देशमुख हे आज सांगली दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना देशात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. प्रस्तावित अशी आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया रद्द झाली होती. त्यामुळे तरूणाईत एक धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बोलतांना श्री. देशमुख म्हणाले,""कोरोना संकटामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. लवकरच प्रक्रिया राबवली जाईल.''

श्री. देशमुख म्हणाले,""कोरोनाच्या युद्धात आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराची चिंता करू नये. सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल. सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना 58 जणांचा बळी गेला आहे, ही खेदाची बाब आहे. त्यासाठी शासन पातळीवरून 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच 55 वर्षावरील 12 हजार पोलिसांना पगारी सुटी देण्यात आली आहे. तसेच 50 ते 55 वर्षातील 23 हजार पोलिसांना ताणविरहित ड्युटी देण्यात आली. तसेच पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी या काळात घेतण्यात आली आहे.''

मानाच्या पालख्या हेलिकॉप्टरने
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,""कोरोना संसर्गाने यंदा वारी रद्द केल्याने 30 जूनला राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने अथवा हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, आता कोरोनाचे संकट राज्यावर आले असल्याने वारकऱ्यांनी घरातच पांडुरंगाची सेवा करावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित असेल. 30 जूनपर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरपुरमध्ये दाखल होतील.प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील.

क्राईम कॅपिटलचा शिक्का
पुसण्यासाठी प्रयत्न; देशमुख

नागपूरचा उल्लेख क्राईम कॅपिटल असा केला जात होता. यामुळे राज्याच्या उपराजधानीची प्रतिमाही मलिन झाली होती. यावर बोलतांना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,""क्राईम कॅपिटल म्हणून उल्लेख केला जात असलेल्या नागपुरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नागपुरातील गुन्हे कमी करण्याच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांना आता यश येऊ लागले आहे.''

  • गृहमंत्री म्हणाले...
  • जिल्हाबंदी उठवण्याचा विचार नाही
  • सोशल डिस्टन्स आणि मास्क गरजेचा
  • आर्थिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न
  • 45 हजार श्रमीक कामगार स्वगृही
  • सायबर क्राईम रोखण्यासाठी विशेष टीम
  • राज्यातील गुन्हेगारी रोखण्यावर निर्देश
Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Sakal

#Hashtags