सामना

1M Followers

जेथे पाहावे तेथे प्रेतांचा खच, उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती

21 Apr 2021.10:17 AM

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने भीषण हाहाकार उडवला आहे. एकीकडे योगी सरकार परिस्थिती 'खुशाल' असल्याचा दावा करतेय. प्रत्यक्षात लसीकरण केंद्रे व रुग्णालयांच्या आवारात नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे. स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र चिता पेटत आहेत. जेथे पहावे तेथे प्रेतांचा खच आणि क्षणोक्षणी घुमणारा अॅम्ब्युलन्सचा आवाज. या वास्तव परिस्थितींची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे योगी सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.

केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार असताना उत्तर प्रदेशातील जनतेच्या मरणयातना दूर का होऊ शकत नाहीत?

असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व तितक्याच पटीने वाढणारा मृत्युदर यामुळे सध्याच्या घडीला उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, वाराणसी, कानपूर आणि अलाहाबाद ही प्रमुख शहरे देशपातळीवरील कोरोनाची प्रमुख 'हॉटस्पॉट' ठरली आहेत. गेल्या वर्षी कोरोना महामारीचे संकट दाखल झाल्यापासून आतापर्यंत राज्यात तब्बल 8 लाख 51 हजार 620 लोकांना विषाणू संसर्ग झाला असून 9830 जणांचा बळी गेला आहे. राज्याला कोरोनाच्या पहिल्या लाटेचाही इतकाच भीषण फटका बसला होता. मात्र 'ग्राऊंड लेव्हल'वरील अत्यंत विदारक परिस्थिती कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान उजेडात आली आहे.

योगी सरकारला लॉकडाऊन नको

उत्तर प्रदेशच्या पाच शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले, पण योगी सरकार त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने आता या लॉकडाऊन आदेशाला स्थगिती दिली आहे. सरकारने यानंतर वीकेण्ड लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

  • उत्तर प्रदेशात सध्याच्या घडीला तब्बल 1 लाख 91 हजारांच्या पुढे कोरोनाचे ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. दरदिवशी 30 हजारांवर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णसंख्येबरोबर मृत्युदर वाढल्यामुळे चिंता भलतीच वाढली आहे.
  • योगी सरकारकडून जाहीर केला जाणारा लखनौ आणि वाराणसी येथील कोरोनाबळींचा आकडा आणि वास्तवात स्मशानभूमींमध्ये पेटणाऱया चिता यांच्यात बरीच तफावत असल्याचे उघडकीस आले आहे.
  • राज्यातील सध्याच्या भीषण परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने 200 टक्के अधिक क्षमतेने कार्यरत राहण्याची वेळ आली आहे. मात्र सध्या अपुऱया मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेला 100 टक्केही सेवा देणे मुश्कील बनले आहे.
Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Saamana

#Hashtags