लोकमत

2.1M Followers

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

23 Apr 2021.3:10 PM

पुणे: पुणे मुंबईसह राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून काही रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. सरकारी यंत्रणांमार्फत ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. आता राज्यातील ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत.

ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे आदेश त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहे.

राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पवार यांनी राज्यातील तब्बल १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. या संबंधी जलदगतीने कार्यवाही करताना वसंत शुगर इन्स्टिटयूच्या वतीने त्यांनी साखर कारखान्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढली आहे. यामुळे राज्यातील विविध रुग्णांना ऑक्सिजनअभावी दुसऱ्या रुग्णांकडे हलवावे लागत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सूर आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशाखापट्टणम येथे 'ऑक्सिजन एक्सप्रेस' देखील रवाना झाली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅंट उभारणीसाठी सुद्धा पावले टाकली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १९० कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना केल्या आहेत. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असेही आवाहन केले आहे.पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपली होती.

नेमकं काय आहे पत्र..

प्रति

अध्यक्ष / कार्यकारी संचालक

विषयः कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मीती व पुरवठा करणेबाबत

महोदय,

आपणा सर्वांना माहितच आहे की, सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे व कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे.

सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल.

सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे. कळावे,

आपला विश्वास,

(शिवाजीराव देशमुख)

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Lokmat

#Hashtags