सकाळ

1.4M Followers

Ukraine Russia War : युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी द्या

05 Mar 2022.7:57 PM

नवी दिल्ली: युक्रेनमधील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांत त्वरित सामावून घेऊन त्यांचे शिक्षण चालू ठेवावे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंतीपत्र लिहिले आहे.

Click here to get the latest updates on Ukraine - Russia conflict

रशियाचे हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत अनेक मुलांना मायदेशी परत आणले. ही मोहीम आणखी आठवडाभर सुरू राहील. या विद्यार्थ्यांना देशातील ५०० हून जास्त वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देणे व त्यांचे शिक्षण खंडित न होण्याची काळजी घेणे यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य व उपचार आयोगाने (एनएमसी) बैठका सुरू केल्या आहेत, त्यात या सगळ्या पर्यायांची चाचपणी करण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालयासह नीती आयोग व अन्य सारे संबंधित वरिष्ठ अधिकारी व मंत्री नजीकच्या काळात एक संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम करतील. 'एनएमसी'च्या नव्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व उमेदवारी (इंटर्नशिप) परदेशातील वैद्यकीय शिक्षण संस्थेत व्हावी यासाठीही भारत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. युक्रेनमधील युद्ध ही आपत्ती मानून या विद्यार्थ्यांना मानवतेच्या आधारावर पुढील शिक्षणासाठी मदत मिळावी यासाठी या मुद्यावर चर्चा करण्यात येईल.

Ukraine Russia War : 'गंगा' अंतर्गत 24 तासात 4 हजार भारतीय मायदेशी

आयएमए म्हणते

गेल्या ६-७ वर्षांत युक्रेनसह अन्य देशांत शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. 'आयएमए'ने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात याचा सविस्तर उल्लेख केलेला दिसतो. हे सारे विद्यार्थी भारतीय नागरिक आहेत. येथील वैद्यकीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण करूनच ते युक्रेनला गेले होते. परदेशांत त्यांच्यावर अचानक संकट कोसळल्याने ते देशात परतले आहेत. त्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करून राज्यातील सरकारी-खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतच त्यांच्या पुढील एमबीबीएस शिक्षणाची व्यवस्था करावी. यासाठी त्या महाविद्यालयांची क्षमताही तत्कालिक स्वरूपात वाढविण्यात यावी. २० हजार भावी डॉक्टरांचे भवितव्य अंधारात व अधांतरी ठेवणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणाची सोय सरकारने त्वरित करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

Russia Ukraine War : भारताचा चौथ्यांदा रशियाच्या विरोधात बोलण्यास नकार

आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार

युक्रेनमधून परतणाऱ्या राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती गोळा करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरवात करण्यात आली असून नॅशनल मेडिकल कमिशनकडे या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याबाबत कोणती योजना आहे? याबाबत विद्यापीठाने विचारणा केली आहे असे आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले. देशातील सर्व वैद्यकीय विद्याशाखांचे प्रवेश 'नीट' प्रवेश पद्धतीद्वारे होत असल्याने या विद्यार्थ्यांना येथील महाविद्यालयात सरळ प्रवेश देता येणे शक्य नाही. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत विश्वासार्ह मूल्यांकन परीक्षा आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आरोग्य विद्यापीठातर्फे www.muhs.ac.in या संकेतस्थळावर या विद्यार्थ्यांसाठी एक अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाद्वारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरून पाठवायची आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Sakal

#Hashtags